Advertisement

जव्हारचे कातकरी कुंटुब पुन्हा उघड्यावर जव्हार डम्पिंग ग्राऊंडवर थाटला संसार.

*जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या घोडचुकीने कातकरी कुटुंबाची दैना*
----डम्पिंग ग्राऊंडवर कुटुंबाची घरवापसी.

*जव्हार प्रकल्प कार्यालय कातकरी कुटुंबाला निवारा देण्यास ठरले अपयशी*

कातकरी समाजाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणार तरी.... कधी?😱

* पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी 
दि.१ जानेवारी २०२३
       अन्न,वस्ञ,निवारा ह्या मानवाच्या दैनंदिन मुलभूत गरजा आजही पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कातकरी कुटुंबाच्या नशिबी न मिळाल्याने त्या आदिवासी कुटुंबाला आपला संसार जव्हारच्या डम्पिंग ग्राऊंडवर थाटल्याचे दुदैव जव्हार तालुक्यात पाहायला मिळत आहे. 
        आदिवासी बांधवांच्या विकासाच्या योजनांवर प्रकल्प कार्यालयाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जातात परंतु कातकरी कुटुंबाला पायाभूत सुविधा देण्यात प्रकल्प कार्यालय अपयशी ठरल्याचा धक्कादायक प्रकार जव्हार तालुक्यात पाहायला मिळतो आहे.जव्हार डम्पिंग ग्राऊंडवर गेल्या काही दिवसांपासुन सदू सखाराम नडगे, वय-५० या व्यक्तीचे कुंटुब राहत आहे. ह्या कुटुंबाची पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी करुन पावसाळ्या आधी ह्या कुटुंबाला प्रकल्प कार्यालयाच्या मदतीने राहावयास खोली दिली होती.परंतु आता तेथे राहणाऱ्या लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे कातकरी कुटुंबाला पुन्हा डम्पिंग ग्राऊंडवर संसार थाटावा लागला आहे.सबंधितांनी कातकरी कुटुंबाला दिलेल्या खोलीचा पाणीपुरवठा बंद करुन खोलीला कुलूप ठोकले आहे.त्यामुळे ह्या कुटुंबाचे सर्व अन्न धान्य,नागली,भात,भांडीकुंडी अडकून राहिल्याने कुटुंब ऐन थंडीत उघड्यावर आले आहे. ह्या कुटुंबाला तात्पुरता दुसरीकडे निवारा देण्याची गरज असताना प्रकल्प कार्यालयाकडून दुर्लक्ष झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निवारा हिरावल्याने कातकरी कुटुंब मालक सदू सखाराम नडगे, त्याची पत्नी संगिता सदु नडगे(वय-४०),मुलगा रमण सदु नडगे(वय-२५), मुलगी सानिका सदु नडगे(वय-४) यांच्या समवेत जव्हार डम्पिंग ग्राऊंड वर पाल ठोकून दुर्गंधीत राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवल्याने ह्या कातकरी कुटुंबाची हेळसांड होत आहे.माझ्या कुटुंबाला निवारा व घरकुल मिळावे अशी मागणी आमच्या प्रतिनिधीशी कातकरी कुटुंबाने बोलताना केली . 
      ह्या कातकरी कुटुबांची एक मुलगी रसिका सदु नडगे(वय-७) हि जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या मदतीने देहरे आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. आजही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर हि कातकरी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदललेला दिसत नाही.कातकरी समाजाला उच्चभ्रु समाजाकडून हीन वागणूक मिळत असल्याने कातकरी कुटुंब व्यसनाच्या आहारी गेलेली दिसतात. हे कातकरी समाजाचे दुर्भाग्य आजही म्हणावे लागेल. 

     "कातकरी कुटुंबाला घरकुल मंजुर झाले असुन त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात येईल.त्यांना खोली दिली होती परंतु सबंधितांनी आक्षेप घेतल्याने त्यांना खोली सोडावी लागली आहे."

----आयुषि सिंह ,जव्हार प्रकल्प अधिकारी.

    "ऐन हिवाळ्यात निवारा हिरावल्याने माझ्या कुटुंबाची हेळसांड झाली आहे.मला घरकुल देऊन निवाऱ्याची सोय व्हावी."
----सदु सखाराम नडगे, पिडित कातकरी कुटुंब.

Post a Comment

0 Comments