Advertisement

वाढता भ्रष्टाचार आणि धार्मिक कट्टरता देशासाठी घातक-राजेंद्र पाडवी महासचिव बिरसा फायटर्स महा राज्य

भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.राज्यघटनेत राजकारणाबाबतचे नियम,अधिकार,कर्तव्ये,जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.घटनेनुसार जनता सार्वभौम आहे.याचा अर्थ जनतेच्या हातात खरी सत्ता आहे.लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात.सरकार समाजाच्या कल्याणासाठी बांधील असेल.पण,आजही स्वातंत्र्यांच्या पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याची सूर्यकिरणे दुरवर गरिबांच्या झोपडीपर्यत पोहचली नाही.आजही हजारो खेडेगावात पाणी,वीज,दळणवळणाचा सोयी,आरोग्य,शिक्षण या मूलभूत सुविधा नाहीत.गरिबांच्या अनेक कल्याणकारी योजना कागदोपत्री दाखवून,अधिकारी,नेते यांच्या संघनमतांने कल्याणकारी योजनेचा कोट्यावधी निधी हडप केला जातो.देशात प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावला आहे.देशात अनेक हजारो कोटींचे घोटाळे उघड झाले आहे.भ्रष्टाचार देवस्थानच्या दानपेटीपर्यत गेला आहे.कुपोषण बालकांच्या आहार,चिक्कीसुद्धा सोडली नाही,असे म्हणतात.बँकांना लाख कोटी रुपयाच्या चुना लावून देश सोडूनही गेले.अनेक राजकीय लोकांचेही हजारो कोटींचे घोटाळे उघड झाले.लोकसेवेची भावना,नैतिकता समाजाचे भले होण्यासाठी झटण्याची वृत्ती,समाजाकडून जे मिळाले, त्यापेक्षा अधिक परत देण्याची बांधलकी अशा भावनांचा अभाव सत्ताधीशांमध्ये अभाव आहे.(काही अपवाद वगळता)राजकीय मंडळी लोकसेवेसाठी सत्तेत येतात की स्वतःची संपत्ती,सत्ता वाढविण्यासाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो.भ्रष्टाचारामुळे विकास कुंठीत होतो तसेच त्यामुळे लोकशाहीच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन होते.यातून मानवी हक्कांचे उल्लंघन,अन्याय आणि निकृष्ट सेवा हे त्रिदोष निर्माण होतात.सध्याच्या परिस्थितीत मुल्यांधिष्टीत राजकारण होतांना दिसत नाही.हा देश तेहतीस कोटी देवांचा आहे,असे म्हटले जाते.दुष्टाचा नायनाट होतो,अशीदेखील श्रद्धा आहे.तरीदेखील जवळपास प्रत्येक टेबलाखालून व्यवहार होतात. देव-धर्माचा आदर्श बाळगणाऱ्यांना आजबाजूला सुळसुळाट असताना भ्रष्टाचाराची दुर्गंधी कशी वाहत नसावी?पंच्याहत्तर वर्षातही दारिद्र्य, दुःख,भ्रष्टाचार,फसवाफसवी,गरिबी संपत नाही.सुशासनासाठी यंत्रणेत पारदर्शकता,कार्यक्षमता हे गुण असणे आवश्यक आहे.कोणत्याही स्तरावर भ्रष्टाचार असता कामा नये.भ्रष्ट यंत्रणा विकासाला अडसर ठरत आहे.आपापल्या राज्यात चांगले प्रशासन,भ्रष्ट यंत्रणेला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.भ्रष्टाचाराचा लढा हा लोकांमधूनच उभा करणे आवश्यक आहे.

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.राष्ट्राला कोणताही धर्म नाही.भारतीय समाजातील विविध धर्मगटांना धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे.कोणत्याही एका धर्माला विशेष महत्त्व नाही.सर्व धर्म समान मानले आहे.धर्म ही व्यक्तिगत बाब मानण्यात आली आहे.संघराज्य व घटकराज्ये यांच्या ध्येय धोरणांवर कोणत्याही विशिष्ट धार्मिक प्रणालीचा प्रभाव असणार नाही.कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य जनतेला आहे.कोणत्याही धर्माच्या आचरणाशिवाय निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष जगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकास आहे. आता काही लोकांकडून धर्मांतर करण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.लोकशाही शासन व्यवस्थेत ही मागणी अयोग्य ठरते.धार्मिक कट्टरता देशासाठी घातक आहे.लोकशाहीमध्ये इतरांच्या अधिकार,हक्क आणि स्वातंत्र्यावर गदा न आणता स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार सर्वांना समान आहे.लोकशाहीचे आदर्श स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधूता व एकात्मता हे आहेत.सध्या,देशात काही धर्मगुरूकडून विषारी भाषणे करून धर्मा-धर्मात विष पेरले जात आहे.धर्माचा आचार्य हा नुसता धार्मिक असून चालत नाही.त्याला एका सामाजिक उत्तरदायित्वाची जोड असावी लागते.त्याला राजकारण आणि समाजव्यवस्था यांचे भान असणे आवश्यक आहे.काही राजकीय नेत्यांकडूनही मते मिळविण्यासाठी,आपल्या स्वार्थासाठी धर्मा-धर्मात द्वेषाचे राजकारण खेळले जाते.धर्माधता आणि हिंसा देशभरात वाढत आहे.देशात,राज्यात अनेक प्रश्न आहेत.त्यांना भिडायचे सोडून जाती,धर्मा-धर्मात विष पेरून भांडणे लावली जात आहे.वाढती बेरोजगारी, वाढती महागाई,खाजगीकरण धोरण,मनुष्यकेंद्री आर्थिक धोरणे नाही,शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची व्यवस्था नाही,विकासाचे विकेंद्रीकरण नाही,चीनची घुसखोरी,आतंकवाद,भोंदूगिरी,फसवेगिरी,गुन्हेगारी प्रवृत्ती व ग्रामीण भागातील समस्या पाणी,आरोग्य,शिक्षण,दळणवळण, वीज यावर कोणाचे मस्तक तापत नाही.लोकशाहीतील महत्वपूर्ण चौथा आधारस्तंभ असलेला प्रसार माध्यमांनीही एखाद्या नेत्यांनी,किंवा धर्मगुरूंनी केलेले फालतू आणि भडकाऊ विधाने वारंवार न दाखविता.चांगले विचार,चांगले, चांगले चित्रपट,समाजप्रबोधन कार्यक्रम,चांगले साहित्य असे समाजहिताचे विचार अधिक दाखविले गेले पाहिजेत .

सर्व धर्मांचे सार एकच असतांना धर्मा-धर्मात विष का पेरले जाते? धार्मिक कट्टरतावादी व काही राजकीय नेत्यांकडून देशातील वातावरण धर्माभोवतीचं का फिरवले जाते?माणसाला जीवन जगण्यासाठी देव-धर्मच लागतो का? या प्रश्नाबाबत सर्व भारतीय नागरिकांनी चिकित्सक वृत्तीनी विचार केला पाहिजे.कोणत्याही लोकशाही राष्ट्राचा प्राण हे त्या राष्ट्राचे नागरिक असतात.समाजात जे धर्माधतेचे आव्हान निर्माण होत आहे;हे राष्ट्र विकासासाठी घातक आहे.सामाजिक सलोखा,राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकांची आहे.सहिष्णूता आणि बहुविविधता या मुल्यांवर आधारलेला भारत टिकविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
     ✍️राजेंद्र पाडवी,राज्य महासचिव बिरसा फायटर्स    मो.९६७३६६१०६०
 email -rajendrapadvi1984@gmailcom

Post a Comment

0 Comments