Advertisement

शिक्षक सुशिलकुमार पावरा यांची 400 उपोषण


*मूळ कागदपत्रांसाठी 15 वर्षे संघर्ष,लढा सुरूच*

*दापोलीतील एका शिक्षकाची संघर्षमय कहाणी* 

*2 लाख दंड व 2 मूळ कागदपत्रे अद्याप मिळेनात* 
 
दापोली: शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 400 वे उपोषण दापोली येथे सुरू केले आहे. उपोषणाचे निवेदन पावरा यांनी गटविकास विकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे. दोषी,भ्रष्टाचारी,षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे या दोन शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31 दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 400 वे उपोषण छेडले आहे.
               विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी खेड हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22 हजार रूपये घेणे,स्वतः कुठल्याही प्रकारचे अपंगत्व नसताना खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून शासकीय सर्व फायदे घेऊन शासनाची फसवणूक करणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्याविरोधातच्या षडयंत्र प्रकरणात स्वत: ला वाचविण्यासाठी 8 आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या बान्ड पेपरवर जबरदस्तीने सह्या करवून घेणे,शिक्षकांचा पगार जाणीवपूर्वक न काढणे इत्यादी गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल त्रिसमीतीय सदस्य चौकशी समितीने दिनांक 4/10/2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिला आहे. दोषी विजय बाईत यांची फक्त खेडहून दापोलीला बदली करण्यात आली.बोगस अपंग प्रमाणपत्र जप्त करण्यात आले,परंतु घेतलेले आर्थिक लाभ वसूल करण्यात आले नाहीत. विजय बाईत यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी सुशिलकुमार पावरा करत आहेत. 
                        नंदलाल कचरू शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठीची आग्रा विद्यापीठाची डिग्री अवैध आहे,ग्राह्य धरता येणार नाही,असा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिला आहे.नंदलाल कचरू शिंदे यांना 5 महिला कर्मचाऱ्यांचा छळ करणे,शिक्षक संघटनांच्या तक्रारी व शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या पत्करण्यास निलंबित करण्यात आले होते.तसेच एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक रत्नागिरी हे दोषी ,भ्रष्टाचारी शिक्षण विस्तार अधिका-यांना वाचवणे,शिक्षक सुशिलकुमार पावरा यांची मूळ कागदपत्रे लपवून ठेवणे इत्यादी 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहेत. 
           सन 2007 साली शिक्षक सुशिलकुमार पावरा यांची दापोली शिक्षण विभागातून एकूण 8 मूळ कागदपत्रे गहाळ करण्यात आली होती,ती कागदपत्रे अधिका-यांनीच लपवून ठेवली आहेत, असा आरोप करण्यात आला होता.त्यापैकी 6 कागदपत्रे शिक्षण विभाग दापोली कार्यालयात अचानक प्रकट झाली होती.अधिका-यांनी पंचनामा करून ती पावरा यांना देण्यात आली.परंतु अद्यापही 2 मूळ कागदपत्रे शिक्षक पावरा यांना देण्यात आली नाहीत. शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या मूळ कागदपत्रे गहाळ प्रकरणी जिल्हा परिषद रत्नागिरीला राज्य माहिती आयोगाकडून तब्बल 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.आपली मूळ कागदपत्रांसाठी व आपल्या हक्कांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना 15 वर्षे संघर्ष करावा लागला आहे.
             400 उपोषण पूर्ण होत असली तरी जोपर्यंत माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत मिळत नाहीत व दोषी अधिका-यांवर कारवाई होत नाही,तोपर्यंत माझा हा लढा मी सुरूच ठेवणार आहे.अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments