Advertisement

कार्यक्रमाला राजकीय नेत्यांना न बोलावण्याचा बिरसा फायटर्सचा निर्णय

*दापोलीत बिरसा मुंडा जयंती उत्सव* 

दापोली: क्रांतीकारक बिरसा मुंडा जयंती उत्सव 15 नोव्हेंबर 2022 रोजी दापोलीतील कांगवई येथे होणार आहे.जिल्ह्य़ातील सर्व आदिवासी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय नेत्यांना म्हणजेच आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न बोलावण्याचा निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला आहे.
              दापोली तालुक्यात पहिल्यांदाच आदिवासी बांधवांकडून क्रांतीकारक बिरसा मुंडा यांची जयंती उत्सव कांगवई येथे धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी कांगवई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम जाधव, पंचायत समिती सदस्य काळूराम वाघमारे,बिरसा फायटर्स व आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे अनेक आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.
                आम्हाला फक्त आदिवासी नेतृत्व मान्य आहे,आमचा नेता हा आदिवासीच असला पाहिजे,आजपर्यंत पक्षांच्या नेत्यांनी आमचा फक्त मतांसाठीच वापर केला,हा कार्यक्रम आदिवासी समाजाचा आहे,त्यामुळे कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे राजकीय गालबोट लागता कामा नये,म्हणून एकाही राजकीय पक्षाच्या पुढा-यांना कार्यक्रमात बोलवायचे नाही,असे एकमुखाने ठराव करण्यात आला.
            या कार्यक्रमाला सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स हे आदिवासींना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्तेच वक्ते ठेवण्यात आले आहेत.कार्यक्रमाला जिल्ह्यातील आदिवासी अधिकारी,कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दापोलीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक अशा प्रशासकीय अधिका-यांनाच कार्यक्रमात बोलावण्याचे ठरले आहे.या जयंती उत्सव निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम ,विविध स्पर्धा,मनोरंजनात्मक खेळ व स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments