Advertisement

वर्गामध्ये आदिवासी क्रांतीकारकांचे फोटो लावा: बिरसा फायटर्सची मागणी

*वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याच्या निर्णयास बिरसा फायटर्सचा विरोध*

 *गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिका-यांना निवेदन*

*बिरसा मुंडाचा शाळेत व कार्यालयात फोटोच नाही,जयंती कशी साजरा करतात?: सुशिलकुमार पावरा*

 दापोली: वर्गामध्ये शिक्षकांच्या फोटोऐवजी आदिवासी क्रांतीकारकांचे फोटो लावा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन दापोलीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले.दापोली पंचायत समितीच्या कक्ष अधिकारी एन.आर.जाधव व शिक्षण विस्तार अधिकारी कल्याणी मुळ्ये यांच्या हातात निवेदन सोपवण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी,कार्याध्यक्ष अरूण वळवी,शिक्षक जावेद शेख सह काही कार्यकर्ते उपस्थित होते.
                   निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाने वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यासाठी शासन निर्णय काढला आहे.त्याला शिक्षकांचा तीव्र विरोध आहे.त्याचबरोबर आमच्या बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेचाही विरोध आहे.जिल्हा परिषद मधील काही शाळांत एकाच शिक्षकांकडे तीन ते चार वर्गाची जबाबदारी दिली जाते.अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व काही शिक्षकांना प्रशिक्षण तसेच कार्यालयीन कामासाठी बाहेर जावे लागत असल्यामुळे काही शाळांत सात ते आठ वर्गाची एकाच शिक्षकांकडे जबाबदारी दिली जाते.तसेच काही शाळांत तीन - चार वर्गाचे एकच वर्गशिक्षक असतात. त्यामुळे या चार वर्गात एकाच शिक्षकाने चार स्वतःचे फोटो लावायचे का? तसेच असे शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्यामागे शासनाचा हेतू अनाकलनीय आहे.म्हणून शिक्षकांच्या फोटो ऐवजी वर्गात आदिवासी क्रांतीकारकांचे फोटो लावण्यात यावेत. 
             भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतीकारकांच्या आहूतीला मोलाचे स्थान आहे.भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीकारक बिरसा मुंडा,राघोजी भांगरे, तंट्यामामा भील,राणी झलकारीबाई,राणी दुर्गावती, खाज्या नाईक,नाग्या कातकरी,राणा पुंजा भील,बाबूराव शेडमाके,तीलका मांझी,सोमा डोमाजी,बिरजू नायक, भीमा नायक,तेजा भील, गुण्डाधूर विद्रोह,चानकु महतो,रेंगा कोरकू,भागोजी नाईक,तेलंगा खडिया इत्यादी आदिवासी क्रांतीकारकांची इंग्रजांविरोधातली लढाई खूप महत्त्वपूर्ण आहे.बिरसा मुंडा यांनी छोटा नागपूर येथे इंग्रजांविरोधात सन 1895 मध्ये मोठा लढा उभारला.इंग्रजांनी त्यांना अटक केली व रांची कारागृहात 1900 साली फाशी दिली.आद्यक्रकंतीकारक राघोजी भांगरे यांनी सुद्धा इंग्रजांविरोधात सह्याद्री भागात मोठा लढा उभारला.मला फाशी देण्यापेक्षा तलवारीने किंवा बंदूकीने मला एकदम वीर पुरूषासारखे मरण द्या. असे इंग्रजांना ठणकावून सांगितले. इंग्रजांनी त्यांना अटक करून सेंट्रल जेल ठाणे येथे 1848 साली फाशी दिली.आदिवासी क्रांतीकारकांचा इतिहास व वीरगाथा अद्यापही जनमानसात पोहचला नाही.शासनाने क्रांतीकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरा करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला आहे.तरी अनेक सरकारी कार्यालयात व शाळांत क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचा फोटोच नसल्याचे आम्हास निदर्शनास आले आहे.क्रांतीकारकांचा फोटोच नसल्यामुळे बिरसा मुंडा जयंती साजरा कशी केली जाते? फक्त कागदोपत्रीच जयंती साजरा करणे हे उचित ठरत नाही.तसेच विद्यार्थ्यांना आदीवासी क्रांतीकारकांची माहिती व्हावी,म्हणून आदिवासी क्रांतीकारकांचे फोटो प्रत्येक शाळेत व वर्गात असावेत, यासाठी शासन निर्णय काढण्यात यावा.याद्वारे आदिवासी क्रांतीकारकांचा इतिहास व विरगाथा जनमानसात पोहचण्यास मदत होईल. म्हणून वर्गात शिक्षकांच्या फोटो लावण्याऐवजी आदिवासी क्रांतीकारकांचे फोटो लावण्यात यावेत,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments