Advertisement

बिरसा फायटर्स धावले बेघर आदिवासी कातकरी कुटुंबाच्या मदतीला

*किराणा,धान्य, भांडी व कपड्यांची मदत*

*त्या कुटुंबाला शासनाच्या योजना मिळत नाहीत*

*घर नाही तिरंगा लावणार कुठं?*

*घरकुल तात्काळ बांधून मिळावे: सुशिलकुमार पावरा* 


दापोली: अतिवृष्टीमुळे कादवण येथील एका आदिवासी कुटुंबांचे घर उद्ध्वस्त होऊन संसार उघड्यावर आला आहे.अतिपावसाने व वा-याने दामू पवार यांच्या घराचे छप्पर उडाले, घराच्या मातीच्या भिंती कोसळल्या.राहायला घर नसल्यामुळे हे कुटुंब कादवण येथील एका पडीत जुन्या बसस्थानकाच्या शेडखाली राहत आहे.हे वृत्त कळताच बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष,गुलाबराव अहिरे तालुका अध्यक्ष, अरूण वळवी सदस्य हे बिरसा फायटर्स आदिवासी कार्यकर्ते कादवण येथील बेघर आदिवासी कातकरी कुटुंबाच्या मदतीला धावून गेले. बिरसा फायटर्स व आदिवासी कर्मचारी परिवार रत्नागिरी यांच्याकडून आर्थिक व वस्तूरूप मदत तातडीने जमा करून 28 ऑगस्ट 2022 रोजी अतिवृष्टीग्रस्त बेघर झालेल्या कादवण येथील आदिवासी कातकरी कुटुंबाला मदत करण्यात आली.
                   किराणा माल, धान्य,अंदाजे 3 महिने पुरेल ऐवढे धान्य,साडी,ड्रेस ,रुमाल ,शाल इत्यादीं कपडे , हंडा, तांब्या, ग्लास इत्यादी भांडी अशी पाच हजार रूपयांपेक्षा पेक्षा अधिक वस्तूरूप मदत देण्यात आली.यावेळी कादवण गावाचे पोलीस पाटील,ग्रामस्थ व कादवण गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.दामू पवार या कुटुंब प्रमुखाचेच आधार कार्ड वरील नाव चुकले असल्यामुळे या कुटुंबांला शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही,अशी धक्कादायक बाब समोर आली. या कुटुंबाला गावातील एका वाड्यात तात्पुरती राहण्याची सोय आम्ही करणार आहोत,असे कादवण गावाचे पोलीस पाटील बोलले.
                   शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविला खरा,पण अजूनही रत्नागिरी जिल्ह्यातील काही आदिवासी कुटुंबांना राहायला स्वतःचे घर नाही.कादवण येथील एक आदिवासी कुटुंब बसस्थानकाच्या पडीत शेडमध्ये आसरा करून राहतेय,ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे.या आदिवासी कुटुंबांकडे शासन व लोकप्रतिनिधी कुणीही लक्ष देत नाहीत. या बेघर कुटुंबाला तात्काळ घरकुल मंजूर करून घर बांधून देण्यात यावे,यासाठी आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे शासनाकडे मागणी करणार आहोत,अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा यांनी दिली.
                     सामाजिक बांधिलकी म्हणून बिरसा फायटर्स कर्मचाऱ्यांनी केलेली ही मदत त्या कातकरी कुटुंबाला आयुष्यभर लक्षात राहणार आहे.त्या कुटुंबांने बिरसा फायटर्सचे आभार मानले आहेत . या आदिवासी लोकांना कुणीतरी मदत करणारे व त्यांच्या दु:खाकडे लक्ष देणारे आहेत हा संदेश या मदतीद्वारे लोकांमध्ये पोहचत आहे.

Post a Comment

0 Comments