Advertisement

माननीय द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती झाल्याबद्दल अभिनंदन

........................................................
 मा.द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती पदासाठी निर्वाचित झाल्या आणि देशातील आदिवासी मध्ये आनंदाचे उधाण आले.ते स्वाभाविकही आहे.कारण आज पहिल्यांदाच देशातील सर्वोच्च पदावर एक आदिवासी महिला विराजमान होणार आहे.तसाही आदिवासी आनंदी होतो तेव्हा नाचण्यासाठी सर्वश्रुत आहे.प्रथम तो स्वतः साठी नाचत होता. नंतर तो राजे रजवाड्यासाठी नाचू लागला,पुढे इंग्रजासमोर नाचू लागला.आणि अलिकडे राजकारण्यासमोर नाचू लागला. हे सततच नाचण पाहून हांसदा सौभद्र शेखर यांनी 'आदिवासी नही नाचेंगे' या शीर्षकाखाली कथा लिहिल्या.पण आदिवासींच नाचण बंद झाले नाही.परवाच मध्यप्रदेशात कोणी आदिवासी कुटूंब आमच्या इशा-यावर नाचत नाही म्हणून त्या कुटुंबातील मुलीला जिवंतच जाळले.झारखंड मध्ये जवळ जवळ १५० लोक नक्षलवादी म्हणून जेलमध्ये होते. त्यांचे विरूध्द कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांना चार पाच वर्षांनी सोडून देण्यात आले.तीन वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील सोनभद्र मध्ये मिळालेली जमिन कसतात म्हणून जमिनदार, सरंजामदार व व्यवस्थेतील तथाकथित संरक्षण कर्ते यांनी एका महिलेसह अकरा आदिवासींना गोळया घालून मारुन टाकले.छत्तीसगड मधील सोनी सोरी अद्यापही लढते आहे.ओडीशा, छत्तीसगड मध्ये विविध खनिजा साठी लाखो आदिवासी विस्थापित होत आहेत. काही विस्थापितांच्या उंबरठ्यावर आहे.हसदेव खाणीचा लढा माहितच असेल. ओडीशा मध्ये खाण माफियांचे राज्य आहे का .असा प्रश्न पडला आहे.या पार्श्वभूमीवर आरएसएस ची विंग वनवासी कल्याण आश्रमाचे नावाने 'आदिवासीत्व' पुसून टाकण्याची पराकाष्ठा करत आहे.गेल्या पाच वर्षापासून वनहक्काच्या कायद्याची अपवाद वगळता संथ गतीने अंमलबजावणी सुरू आहे.आता तर या कायद्यालाच बायपास करून मोठ्या उद्योग समुहाला परस्पर परवानगी देण्याचे सुरू आहे. कायदा पातळ कसा होईल याकडेच विद्यमान सरकारचे लक्ष आहे.महाराष्ट्रामध्ये पेसा कायद्याला बाजूला ठेवून, एक अल्पशी अधिसूचना काढून त्यालाही पातळ केल्या गेले.एवढे सर्व होऊनही आदिवासी खासदार-आमदार जे बहुसंख्येने बीजेपी चे आहे.कोणीही आदिवासीचे बाजूने बोलल्याचे,लिहिल्याचे आढळले नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही माननीय द्रौपदी मुर्मू यांचे कडे पाहतो.त्या आदिवासी असल्याचा आणि आता राष्ट्रपतीपदावर विराजमान होत असल्याचा आनंदच आहे.पण हा आनंद दलित-शोषित-आदिवासी च्या बाजूने भूमिका घ्यायची वेळ येईल तेव्हा तेव्हा माननीय द्रौपदी मुर्मू घेतील तेव्हाच द्विगुणित होईल. त्या सर्व दलित शोषित आदिवासींच्या बाजूने सच्चा दिलाने राहतील. अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नसावी.त्या स्वतः लढावू अशा संथाल जमाती मधून आल्या आहेत.
 त्यांचे मनापासून अभिनंदन!

प्रभू राजगडकर  
नागपूर 
२२जूलै २०२२

Post a Comment

0 Comments