Advertisement

थोडा काळ थांबा, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल'

      राज्य प्रतिनिधी:- 
एसके जी पंधरे महाराष्ट्र सह- संघटक राष्ट्रीय पञकार संघ (भारत सरकार मान्यता प्राप्त )
 

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीप झुगारून मतदान केले आहे. आता सर्वोच्च न्यायालय या सगळ्याचा निवाडा करण्यासाठी खंडपीठ नेमणार आहे. येत्या तीन-चार महिन्यांमध्ये या सगळ्याचा निकाल लागेल. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेले आहे. त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये होईल. त्यासाठी खंडपीठाची नेमणूक हीच सर्वोच्च न्यायालयाची कृती अतिशय गंभीर आहे. विधीमंडळात जे काम झाले आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, हा त्याचा संदेश असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है. असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन

देशातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवले होते. महाराष्ट्रातील सत्तापालटापूर्वी शिवसेना महाविकास आघाडीसोबत जाऊन यशवंत सिन्हा यांना मतदान करेल, अशी आशा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. यावरुन वादंग निर्माण झाला होता. जयंत पाटील यांनी राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रपती निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, नेहेमीच त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, त्यांना त्यांनी पाठींबा दिलेला आहे. यापुर्वी प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांनाही त्यांनी पाठींबा दिला होता.

Post a Comment

0 Comments