Advertisement

बिरसा फायटर्समुळे आदिवासींना मिळाला स्मशानभूमीचा रस्ता

*चोरीला गेलेला स्मशानभूमीचा रस्ता आदिवासींना सापडला*

*सीईओ व बिडीओने घेतली बिरसा फायटर्सच्या तक्रारीची दखल* 

रत्नागिरी:दापोली तालुक्यातील कुडावळे आदिवासीवाडीतील स्मशान भूमीचा रस्ता गायब झाला आहे,तो शासनाने शोधून द्यावा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
                  जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिपळूण उपविभाग दापोली यांच्याकडून 14 व्या वित्त आयोगाकडून 2018-19 अंतर्गत कुडावळे आदिवासी स्मशान भूमीकडे जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामासाठी एक लाख रूपये खर्च दाखवण्यात आला होता.हा रस्ता तयार केल्याची पाटीही गावात लावण्यात आली होती.परंतु प्रत्यक्षात या रस्त्याचे कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही.कुडावळे आदिवासीवाडीतील नागरिकांना स्मशानभूमीत मृतदेह नेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
                    स्मशानभूमीकडे जाणारा मार्गही पायवाट आहे.ही पायवाट सुद्धा जंगलातून जाते.या पायवाटेवरून 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून खडीकरण व डांबरीकरण रस्ता केल्याची कागदोपत्री पाटी दिसत होती.आमच्या स्मशानभूमीचा चोरीला गेलेला रस्ता शासनाने तात्काळ शोधून द्यावा ,अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांनी केली व तसे निवेदन बिरसा फायटर्स तर्फे गटविकास अधिकारी दापोली यांना देण्यात आले.
                     बिरसा फायटर्सची तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिका-यांनी सरपंच व ग्रामसेवक कुडावळे यांना लेखी पत्र देऊन रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याचे निर्देश दिले.अखेर कुडावळे आदिवासीवाडीतील स्मशानभूमीचा अर्धा रस्ता तयार करण्यात आला असून अर्धा रस्ता अजून निधी अभावी तयार झाला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.चोरीला गेलेला स्मशानभूमीचा रस्ता शोधून दिल्याबद्दल कुडावळे येथील आदिवासी बांधवांनी बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments