Advertisement

25 टक्के विद्यार्थी आरक्षण प्रवेश प्रक्रिया न राबविणा-या खाजगी शाळांची मान्यता रद्द करा: बिरसा फायटर्सची मागणी


*वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकडूनही फी वसूली* 

*शिक्षणाचा अधिकार कायद्याचे पालन होत नाही*

*संस्थाचालक मनमानीपणे व बेकायदेशीर शाळा चालवतात* 

रत्नागिरी: RTE कायद्यानुसार शाळेत 25% विद्यार्थी आरक्षण प्रवेशप्रक्रिया न राबविणा-या व पालकांकडून मनमानीपणाने फी हडपणा-या दापोली तालुक्यातील व जिल्ह्यातील खाजगी शाळांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन दापोलीचे गटशिक्षणाधिकारी यांनाही देण्यात आले आहे.
             निवेदनात म्हटले आहे की, RTE कायद्यानुसार व शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कायद्यातील कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.या दुर्बल घटकांत SC,ST,OBC, VJNT, SBC या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो.दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश वंचित घटकांत आहे.अशा वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उत्पन्नीची कोणतीच अट नाही.केवळ जातीच्या दाखल्यांच्या आधारे शाळेत प्रवेश दिला जातो. 
                 शैक्षणिक वर्ष सन 2022-23 या चालू वर्षांत  दापोली तालुक्यातील व जिल्ह्य़ातील काही खाजगी शाळांमध्ये अशा प्रकारची 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया जाणीवपूर्वक राबवली गेली नाही.त्यामुळे वंचित व दुर्बल घटकातील,मागासवर्गीय विद्यार्थी या सवलतीपासून वंचित आहेत. काही शाळांतील संस्थाचालक पालकांकडून जबरदस्तीने व मनमानी कारभार करून विद्यार्थ्यांची फी वसूल करत आहेत. RTE कायद्याचे काही शाळांत पालन होताना दिसत नाही.पालकांकडून जास्तीत जास्त पैसे उकडणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थाचालक ह्या शाळा मनमानीपणे व बेकायदेशीररित्या चालवत आहेत.  ही एक गंभीर बाब असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 25% आरक्षण सवलतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचे कारस्थान ह्या शाळेतील संस्थाचालक करत आहेत. म्हणून अशा शाळांची सखोल चौकशी करून 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया न राबविणा-या व मनमानीपणे पालकांकडून फी घेणा-या संस्थाचालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अशा शाळांची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्यात यावी,हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी शिक्षणाधिका-यांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments