*आदिवासी तरूणांच्या भरतीकडे नजरा*
*मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन*
रत्नागिरी:आदिवासींच्या 11 हजार 500 रिक्त जागा तात्काळ भरा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध विभागात आदिवासी समाजाच्या एकूण 11 हजार 500 रिक्त जागा आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये आदिवासींच्या एकूण 55 हजार 319 जागा आहेत. त्यापैकी काही जागांवर खोट्या आदिवासींच्या दाखल्यावर कर्मचारी काम करत आहेत. काही उमेदवारांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहेत. तर काही उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सिद्ध होत नसल्यामुळे 17 हजार 180 प्रकरणे बरेच वर्षांपासून जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित आहेत. राज्यात आदिवासी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.ठाणे,पालघर,नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे,यवतमाळ, अमरावती,औरंगाबाद,किनवट,नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील समित्यांकडे 17 हजार जात वैद्यता प्रमाणपत्रांचे दावे प्रलंबित आहेत. त्यापैकी 11 हजार 435 जागा रिक्त असल्याची माहिती तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात दिली होती.
या 11 हजार 435 रिक्त जागा भरण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेने माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे वारंवार केली आहे.तसेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडेही तक्रार केली आहे.आदिवासी समाजाचे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार कधी ना कधी ह्या रिक्त जागा भरेल,अशी आशा आहे.गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सरकारने आदिवासींच्या प्रश्नांंकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नाही. म्हणून आपल्या सरकारतर्फे आदिवासींच्या 11 हजार 435 रिक्त जागा भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात यावी व रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात,अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
0 Comments