Advertisement

शहाद्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवन यांची पदावरून हकालपट्टी करा: बिरसा फायटर्सची मागणी


*पोलीस ठाणे बंद ठेवून तक्रारदारास व समाजसेवकांनाच धमकावत असल्याची तक्रार* 

 शहादा: पोलीस ठाणे बंद ठेवून तक्रारदारास व समाजसेवकांनाच धकमावणा-या,लोकांशी उर्मट-उद्धट वर्तन करणा-या दिपक बुधवन पोलीस निरीक्षक शहादा यांना सेवेतून निलंबित करून पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                निवेदनात म्हटले आहे की,शहादा तालुक्यातील असलोद येथील पोलीस दुरक्षेत्र बंद असल्यामुळे श्री.जालिंदर पावरा गांव आडगाव ह्या तक्रारदाराच्या व तक्रारदाराच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याची माहीती समाजसेवक सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस निरीक्षक दिपक बुधवन यांना फोनद्वारे दिली.तेव्हा दिपक बुधवन यांनी फोन उचलत उर्मटपणे बोलले की,बोला पावरा, तेथील अंमलदार परदेशी माझ्यासमोरच आहे,तुम्ही कोण बोलताय? कुठून बोलताय? तुमचा पत्ता सांगा,तुम्ही कुठे नोकरी करता? यावर सुशिलकुमार पावरा यांनी उत्तर दिले की,मी सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स बोलत आहे.असलोद पोलीस क्षेत्रातल्या तक्रारीबाबत बोलायचे आहे. तेव्हा दिपक बुधवन उद्धटपणे बोलले की,ते सोडा ,तुम्ही काय करता ? ते सांगा? यावर सुशिलकुमार पावरा यांनी उत्तर दिले की,मी दापोली जिल्हा रत्नागिरीत राहतो, एक सामाजिक कार्यकर्ता आहे ,सामाजिक कार्य करतो. हे ऐकून पुन्हा दिपक बुधवन यांनी ते जाऊ द्या हो,तुम्ही खायला काय करता? पोटासाठी काय करता? काय कामधंदा करता? असे अपमानित करणारे शब्दप्रयोगाचा वापर केला.तरी सुशिलकुमार पावरा यांनी सहनशीलतेने उत्तर दिले,मी इकडे नोकरीला आहे.शिक्षण विभागात आहे.त्यावर दिपक बुधवन यांनी तुमचा पत्ता द्या? पत्ता सांगा?नोकरीचा पत्ता सांगा ?अशी धमकावण्याची उर्मट-उद्धट भाषा वापरली.
            वरील संदर्भीय विषयाच्या संभाषणावरून दिपक बुधवन पोलीस निरीक्षक शहादा हे समाजसेवकांना,सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी यांना धमकावण्याची भाषा वापरतात, अपमानित करतात असे दिसून येते.पोलीस ठाणे बंद ठेवून आपली जबाबदारी झटकत उलट तक्रारदार समाजसेवकांनाच उद्धटपणे बोलतात. पोलीस निरीक्षक दिपक बुधवन यांचे हे वर्तन लाजीरवाणे व पोलीस निरीक्षक पदाला अशोभनीय आहे.तसेच अशाप्रकारे पोलीस निरीक्षकच पोलीस ठाणे बंद ठेवून आपल्या कर्तव्यात कसूर करत असेल तर शहादा तालुक्यातील जनतेची सुरक्षा धोक्यात आहे व एकंदरीत सदर पोलीस निरीक्षक हे आपल्या पदाचा गैरवापर आणि तक्रारदारांशी, समाजसेवकांशी व आदिवासी संघटनांशी भेदभाव करत आहेत.
                  शहाद्याचे आमदार मा.राजेश पाडवी व काही सामाजिक संघटनांनी दिपक बुधवन पोलीस निरीक्षक शहादा यांच्याबद्दल वरिष्ठांकडे व गृहमंत्री मंत्रालय मुंबई यांच्याकडे यापूर्वी अनेक तक्रार अर्ज दिले आहेत. त्यामुळे दिपक बुधवन पोलीस निरीक्षक शहादा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.जनतेशी,तक्रारदारांशी,लोकप्रतिनिधींशी ,सामाजिक कार्यकर्त्यांशी व सामाजिक संघटनांशी सहकार्याची भावना अजिबात दिसून येत नाही. म्हणून पोलीस ठाणे बंद ठेवून आपल्या कर्तव्यात कसूर करणा-या, कर्तव्यावर नसणा-या ठाणे अंमलदार असलोद श्री.परदेशी यांना पाठीशी घालणा-या व तक्रारदार ,समाजसेवकांनाच धमकावत सामाजिक सलोखा बिघडविणा-या दिपक बुधवन पोलीस निरीक्षक शहादा यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे व शहादा पोलीस निरीक्षक पदावरून हटविण्यात यावे,हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा सुद्धा बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments