Advertisement

अटल आरोग्य वाहिनी सुविधा आश्रम शाळेत पुन्हा सुरु करण्याची बिरसा फायटर्सची मागणी


*आधीच्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत प्राधान्य द्या:सुशिलकुमार पावरा*

 तळोदा: अटल आरोग्य वाहिनी सुविधा पुन्हा सुरु करुन आधी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत प्राधान्य द्यावे,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी व प्रकल्प अधिकारी तळोदा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे केली आहे.
             निवेदनात म्हटले आहे की, अटल आरोग्य वाहिनी सुविधेत काम करणा-या अन्याय ग्रस्त कर्मचाऱ्यांचा दिनांक 13/06/2022 रोजी संघटनेस अर्ज प्राप्त झाला आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय शासन निर्णय दिनांक 18/03/2013 अन्वये महाराष्ट्रातील आदिवासी आश्रम शाळेत आदिवासी विकास विभागामार्फत आरोग्य सुविधेकरिता अटल आरोग्य वाहिनी ही सुविधा सुरू करण्यात आली होती.दिनांक 29 नोव्हेंबर 2018 पासून या सुविधेत काम करणा-या डॉक्टर, पायलट या कर्मचाऱ्यांनी निस्वार्थपणे उत्तम सेवा बजावली आहे.कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक विद्यार्थ्यांचे जीव वाचवले आहेत. दुर्गम भागातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्युचे प्रमाण कमी करण्यात या
 कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.या सुविधेद्वारे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्याची चांगली सेवा देण्यात आली. परंतु ही सुविधा मे 2022 मध्ये अचानक बंद करण्यात आली.त्यामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्याच्या या सुविधापासून वंचित ठेवण्यात आले आहे.तसेच या सुविधेत काम करणा-या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून बेरोजगार करण्यात आले आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर कर्मचाऱ्यांना ज्यादा काम करवून घेऊन 1-2 महिन्यांचा पगार-मानधन सुद्धा अद्याप देण्यात आले नाही.तो उर्वरित महिन्यांचा पगार सुद्धा त्वरित देण्यात यावा.आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सुरु करण्यात आलेली अटल आरोग्य वाहिनी सुविधा पुन्हा सुरु करण्यात यावी.या सुविधेत आधी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच सेवेत प्रामुख्याने प्राधान्य देण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments