Advertisement

आदिवासींचा मरणाच्या जागेसाठी संघर्ष

*यापुढे प्रेत तहसिल कार्यालयात जाळू:ग्रामस्थ आक्रमक* 

*बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा*



दापोली: आजपर्यंत आपण माणूस हा जगण्यासाठी संघर्ष करत असल्याचे ऐकले होते.परंतु जामगे विसापूर येथील आदिवासी कातकरी बांधवांना मरणाच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे.ही एक शोकांतिकाच म्हणावे लागेल.या गावातील चार वाडीतील लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेवर प्रेत जाळण्यात जलसंधारण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे या आदिवासी लोकांना प्रेत जाळणे,अंत्यसंस्कार करणे यासाठी उपेक्षित ठेवले जात आहे.स्मशान जागेजवळ पाण्यासाठी बोअर वेल खोदण्यास परवानगी देण्यात आली,मात्र स्मशान शेड बांधण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.त्यामुळे शासनाकडून स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी मंजूर झालेले अडीच लाख रूपये परत गेले आहेत. 
                    ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी जामगे विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी संपादित केलेल्या धरणाच्या खालील बाजूस शिल्लक जागेमध्ये स्मशान शेड बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु सध्या धरणाचे काम प्रगती पथावर असून अद्याप सांडवा, प्रवेश व पुच्छ कालव्याचे कामास सुरुवात झालेली नाही. सदर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या जागेमध्ये पुच्छ कालव्याचे काम करणेत येणार आहे. त्यामुळे धरणाच्या अनुषंगाने इतर कामे करणेची असल्याने धरणाच्या खालील बाजूस संपादित जागेमध्ये स्मशान शेड बांधण्यासाठी परवानगी या कार्यालयाकडून देता येत नाही असे आपणास या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.बबन बाबाजी बेंद्रे विसापूर यांचे बरोबर या कार्यालयाचे जलसंधारण अधिकारी यांचे समवेत दिनांक 16/11/2021 रोजी प्रत्यक्ष जागेवर झालेल्या पाहणी दरम्यान झालेली चर्चे नुसार मौजे जामगे तालुका दापोली येथील गट क्रमांक 234 ब मधील योजनेसाठी संपादित क्षेत्र 0-63-00 हेक्टर आर वगळून धरणाच्या खालील बाजूस शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये क्षेत्र 0-34-50 हेक्टर आर स्मशान शेड बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात आला आहे. असे पत्र उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग दापोली यांनी सरपंच निर्मल ग्रामपंचायत विसापूर यांना दिनांक 22/11/2021 रोजी देण्यात आले आहे.
         या गांवातील लोकांनी आत प्रेत कुठे जाळायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने स्मशान शेड बांधण्यास परवानगी दिली नाही,तर आम्ही आता यापुढे कुणीही मयत झाले तर तहसिल कार्यालय दापोली येथे प्रेत नेणार आहोत व तेथे प्रेत जाळणार आहोत.गावात धरण बांधू देणार नाहीत, अधिका-यांना दगडे मारू,असा आक्रमक पवित्रा जामगे येथील आदिवासी बांधवांनी दिला आहे.यावेळी जामगे गावातील चार वाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी स्वत: जामगे येथे जाऊन आदिवासी बांधवांची ही समस्या जाणून घेतली व ही समस्या प्रशासनाने सोडवली नाही तर आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फै तीव्र आंदोलन करणार आहोत, असा आंदोलनाचा इशारा प्रशासनास दिला आहे.

Post a Comment

0 Comments