Advertisement

जखमी रानपिंगळ्याला दिले जीवदान ग्रीनफ्रेंड्सचा युवराज बोबडे ने केली सुश्रुषा

साकोली:-
   येथील नागझिरा रोडवरील असलेल्या पशु चिकित्सालयाजवळ सकाळी सकाळी जखमी अवस्थेत रानपिंगळा(इंग्रजी नाव - जंगल बारड औवलेट,शुद्ध  नाव:- जंगल पिंगळा ) ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोलीचा निसर्गमित्र युवराज बोबडे याला निपचीत अवस्थेत आढळला.पंखावर जखम असल्याने त्याला उडता सुद्धा येत नव्हते. युवराजने तात्काळ रानपिंगळ्याच्या जखमी पंखावर लागलेले मुंग्या, अळ्या तसेच किडे वैद्यकीय द्रावणाने साफ करून ती जागा स्वच्छ केली.त्यानंतर हळद वगैरे लावून त्याचे प्रथमोपचार केले.दोन तासानंतर रान पिंगळ्या मध्ये ऊर्जा, चैतन्य येऊन  हालचाल करण्यास सुरवात केली.अधिक सजीवतेने हालचाल करून उडण्याचा प्रयत्न करू लागला. पक्षीखाद्य दिल्यानंतर रानपिंगळा निसर्गात मुक्त होण्यास सज्ज झाला. त्याला जंगल क्षेत्रात युवराजने मुक्त केल्याबरोबर भर्रकन मुक्त भरारी घेतली.प्रथमोपचारवेळी  युवराजचा भाऊ प्रतीक बोबडेने सुद्धा सहकार्य केले. दोन तासाच्या धावपळीने   रानपिंगळाचे प्राणपाखरू वाचल्याने युवराजच्या मुद्रेवर  निसर्गसेवा घडल्याचे प्रसन्नतेचे भाव होते.ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी युवराजचे अभिनंदन करून याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की याचे शास्त्रीय नाव 'ग्लासीडीयम रेडियेटम' असून हा विरळ जंगल ते घनदाट जंगलात याचे वास्तव्य असते. गावात किंवा गावशेजारी याचे वास्तव्य फार क्वचितच आढळते.पहाटे व गर्द सायंकाळी विशिष्ट आवाज काढून अस्तीत्वाची चाहुल देत असतो. याचा भाऊबंद "ठिपकेवाला पिंगळा" मात्र गाव किंवा गावाशेजारील अधिवासात राहतो. रानपिंगळाचा मार्च ते मे महिना विणीचा हंगाम असून याचे खाद्य किडे, सरडे व सरपटणारे छोटे प्राणी, छोटे पक्षी इत्यादी आहे. वाढत्या वृक्षकटाईने यांचे अधिवास धोक्यात येत आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी पुरविली. ग्रीनफ्रेंड्सचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व निसर्गप्रेमी विद्यार्थी नागरिकांनी युवराजच्या या तत्पर निसर्गसेवेबद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments