Advertisement

शिक्षकांच्या पगारावरून राजकारण पगाराचा पत्ता नाही,श्रेयवादासाठी शिक्षक संघटना पुढे पुढे



दापोली: प्राथमिक शिक्षकांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार 16 एप्रिल उजाळला तरी अद्याप जमा झाला नाही. त्यामुळे अनेक शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत. घर भाडे,लाईट बील,गृहकर्ज,वाहन कर्ज इत्यादी विविध कर्जाचे हप्ते भरायचे कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांचा पगार हा नेहमीच चर्चेचा विषय बनतो.दरमहिन्याला एक तारीखेला शिक्षकांचा पगार होईल, अशा पोकळ आश्वासने अनेक नेते शिक्षकांना देतात.मात्र सलग 3 महिने शिक्षकांचा पगार होत नाही तेव्हा या नेत्यांनाही आपल्या आश्वासनाचा विसर पडतो.पगार लवकर व्हावा,म्हणून अनेक शिक्षक संघटनांकडे मागणी करतात.शिक्षक नेतेसुद्धा पगार आज होईल, उद्या होईल म्हणत शिक्षकांना केवळ मानसिक आधार देतात आणि जेव्हा प्रशासकीय स्तरावरुन पगार जमा होण्याचा अंदाज येतो,तेव्हा केवळ आमच्याच पाठपुराव्यामुळे पगार जमा होत आहे असे श्रेयवादाचे मेसेज वाटसपसारख्या सोशल मीडीयावर काही शिक्षक संघटनांच्या नेत्यांकडून टाकले जातात.
         13 एप्रिलला कुठल्याही स्थितीत शिक्षकांचा पगार जमा होईलच,असे काही नेत्यांकडून सांगण्यात आले होते.तसे मेसेज वाटसप टाकण्यात आले. परंतु पगार जमा झालाच नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे, हनुमान जयंती, रविवार अशा सलग 4 दिवस सुट्ट्या आल्यामुळे शिक्षकांची पगाराची आशा मावळली.सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या बाजूच्या जिल्ह्यात शिक्षकांचे पगार मार्च महिन्यातच जमा झाले ,मात्र रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल संपायला आला तरी पगाराचा पत्ता नाही , म्हणून शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.  
         महागाईचा फरक व पगार असे एकत्रित रक्कम शिक्षकांना देण्यासाठी शिक्षण विभाग कार्यालयाने पगार बीले तयार केली, परंतु ऐनवेळी जिल्ह्याच्या ट्रेझरीत एवढी रक्कम शिल्लक नसल्यामुळे बीले रद्द करावी लागली.आता फक्त पगाराची बीले तयार करून फाईल पुढे सरकवली आहे. असे पगार न झाल्याचे कारण संबंधित कार्यालयाकडून सांगण्यात आले. येत्या सोमवार,मंगळवारी तरी आपला पगार होईल या प्रतिक्षेत गुरूजी आहेत.

Post a Comment

0 Comments