Advertisement

व्हिजन दापोली इ. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचे यशस्वी आयोजन


दापोली- दापोली पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित ' व्हिजन दापोली ' उपक्रमांतर्गत " VDS- IV EXAM ( 2022 ) या शिष्यवृत्ती परीक्षेचे दापोली तालुक्यातील सर्व जि. प.  प्राथमिक शाळांमधून नुकतेच  आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र परीक्षा मंडळ ज्याप्रमाणे इ. ५वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करते त्याच धर्तीवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दि. २६ एप्रिल रोजी दापोली तालुक्यातील २७ परीक्षाकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. अत्यंत नीटनेटके व काटेकोर नियोजन व अंमलबजावणी हे या परीक्षेचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
        इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्याच्या ग्रामीण भागातील अधिकाधिक शालेय विद्यार्थी चमकावेत, शिष्यवृत्तीधारक बनावेत यासाठी गेल्या काही वर्षांपासून दापोली पंचायत समितीने ' व्हिजन दापोली ' हा उल्लेखनीय उपक्रम सुरु केला आहे.  गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाचे फलितही अगदी ठळकपणे दिसू लागले आहे. व्हिजन दापोली या शैक्षणिक उपक्रमाची राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी दखल घेतली असून ' व्हिजन दापोली ' उपक्रमाचे कौतुक केले आहे. इ. ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची आधीपासूनच ओळख व्हावी, त्या दृष्टीने तयारी व्हावी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती परीक्षेची कल्पना यावी यासाठी या परीक्षेच्या धर्तीवर इ. ४थी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. दापोली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे परीक्षा मंडळाच्या धर्तीवर काटेकोर नियोजन करण्यात आले होते. 
दापोली तालुक्यातील २७ परीक्षाकेंद्रांवर ही परीक्षा दि. २६ एप्रिल रोजी घेण्यात आली. दापोली तालुक्यातील सुमारे १०९५ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते.  अण्णासाहेब बळवंतराव यांच्या नेतृत्वाखाली दापोली पंचायत समिती शिक्षण विभागातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, व्हिजन दापोली उपक्रमाचे प्रमुख पदाधिकारी,  मुख्यसमिती सदस्य आदी सर्वांनीच या परीक्षेसाठी अतोनात मेहनत घेतली. सदर परीक्षेतून १०० गुणवत्ता धारक विद्यार्थी निवडून तेच विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचे ध्येयपूर्ती करतील यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी होणार आहे.  प्रत्यक्ष शिष्यवृती परीक्षेची तयारी व्हावी, शालेय विद्यार्थ्यांना अशा परीक्षांचा अनुभव वाढावा यासाठी अशा परीक्षा आवश्यक व उपयोगी आहेत असे मत यानिमित्ताने अनेक शिक्षणप्रेमींनी व्यक्त केले आहे. दापोली पंचायत समिती आणि ' व्हिजन दापोली '  अंतर्गत घेण्यात आलेल्या VDS- IV ( २०२२ ) या शिष्यवृत्ती परीक्षा उपक्रमाचे दापोली तालुक्यातून आता सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments