Advertisement

मलगाव अंतर्गत गुराडपाडा येथील वीज, रस्ता, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांवर बिरसा फायटर्स आक्रमक


चौकशी आदेशानंतरही प्रत्यक्ष कामे सुरू नसल्याने ठिय्या आंदोलनाचा इशारा

शहादा : तालुक्यातील मलगाव अंतर्गत गुराडपाडा येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वीज, रस्ता, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांसारख्या मूलभूत प्रश्नांना सामोरे जात आहेत. या समस्यांबाबत बिरसा फायटर्सच्या वतीने यापूर्वी प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून चौकशी व कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आदेश होऊनही प्रत्यक्ष विकासकामांना अद्याप सुरुवात झालेली नसल्याचा आरोप बिरसा फायटर्सने केला आहे.
या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष मा. गणेश खर्डे यांच्या वतीने जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठपुरावा निवेदन देण्यात आले आहे.

गुराडपाडा येथे सुरळीत वीजपुरवठा करणे, गावाकडे जाणारा रस्ता पक्का करून सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीस योग्य करणे, शाळेची इमारत व शैक्षणिक सुविधांची दुरुस्ती करणे तसेच नागरिकांसाठी आरोग्य व प्राथमिक उपचाराची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीचा अहवाल आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांना लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी गुराडपाडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन समस्यांची पाहणी करावी आणि कामे केव्हा सुरू होणार आहेत, याबाबत ग्रामस्थ व बिरसा फायटर्सला लेखी माहिती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“प्रशासनाकडून चौकशीचे आदेश होऊनही प्रत्यक्ष कामे सुरू होत नसतील, तर केवळ आदेश काढून प्रश्न प्रलंबित ठेवण्याला अर्थ नाही. संबंधित विभागांनी तातडीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विकासकामांना सुरुवात करावी,” अशी भूमिका मा. गणेश खर्डे यांनी मांडली.

प्रशासनाने गुराडपाडा येथील प्रलंबित मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आणि प्रत्यक्ष कामांना तातडीने सुरुवात न केल्यास बिरसा फायटर्सच्या वतीने संबंधित कार्यालयासमोर लोकशाही व शांततामय मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

गुराडपाडा ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात करावी, अशी ठाम मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.
 
       मा.गणेश खर्डे
       राज्य उपाध्यक्ष, 
बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments