Advertisement

आला उन्हाळा तब्येत सांभाळा असे आवाहन डॉ हिरा पावरा समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र कोडीद यांनी केले


    या वर्षी चैत्र महिन्याची चाहूल लागण्याआधीच महाराष्ट्रातील हवामान एकदम बदलले आहे. तीव्र उन्हाळा अचानक सुरू झाला. वृक्षतोड, प्रचंड इंधनवापर यासारख्या माणसाने चालवलेल्या उद्योगांमुळे, सावकाश एका ऋतुतून दुसऱ्या ऋतूत होणारे स्थित्यंतर आता घडताना दिसत नाही . मग अचानक अशा तीव्र बदलांना तोंड द्यावे लागत आहे . शरीर या तीव्र बदलांशी झटकन जुळवून घेउ शकत नाही, साहजिकच त्याचा  विपरीत परिणाम आरोग्यावर होतो .

खूप तहानतहान होणे,  भूक कमी लागणे ,भरपूर घाम ,अंगाची चिकचिक अंगावरती घामोळे उठणे, थकवा वाटणे , चिडचिड होणे अशी साधारण स्थिती सर्वांचीच असते .

उन्हाळा सुरू झाल्यावर एकदम थंड पाण्याने आंघोळ सुरु न करता ,हळूहळू कोमट आणि मग सोसेल असे थंड पाणी वापरावे. आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्यास अतिशय फ्रेश वाटते.

साबण वापरण्याऐवजी वाळविलेली संत्रासाल, लिंबू साल यांच्या पावडरी, वाळा, नागरमोथा चूर्णाचा उपयोग केल्यास त्वचा स्वच्छ. मुलायम, थंड सुगंधी राहते .

घामोळ्याचा त्रास असल्यास उकडलेल्या कैरीचा गर अंगाला लावून, मग आंघोळ केली तर फार छान उपयोग होतो.

कडुलिंबाची पाने रात्री आंघोळीच्या पाण्यात टाकून, ते पाणी सकाळी आंघोळीसाठी वापरल्यास उन्हाळ्यात होणाऱ्या सर्वच त्वचारोगापासून रक्षण होते.

या काळात शक्यतो सुती कपडे वापरणे चांगले !फॅशनचया नावाखाली घट्ट, गडद रंगाचे , सिन्थेटिक कपडेवापरल्यास ,शरीरातली उष्णता वाढून,घाम साठुन त्वचाविकार होणार हे निश्चित!

  मोगरा,जाई, चमेली,सोनचाफ्याची फुले  यांचे गजरे,अत्तरे वापरण्यास हरकत नाही. या नैसर्गिक सुगंधामुळे उन्हाळ्यात होणारी मनाची तगमग शांत होते. आजूबाजूचे वातावरण व आपले मन प्रसन्न होते.

या काळात दुपारच्या उन्हात फिरणे शक्यतो टाळावे. जाणे अपरिहार्य असल्यास छत्री,रुमाल,टोपी, गॉगलचा वापर करावा .दुपारी थोडी विश्रांती घ्यावी.

जास्त उत्साहाने तीव्र व्यायाम या काळात करणे योग्य नाही. त्याऐवजी सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम ,सकाळी लवकर  करावा.  नेमके उन्हाळ्याच्या सुट्टीतच लोक उत्साहाने जिम जॉइन करतात, हे नक्कीच कालविरुद्ध आणि आरोग्याला घातक आहे.

या काळात तहान खूप लागते आणि भरपूर, थंड पाणी प्यावेसे वाटते . परंतु फ्रीजचे पाणी अजिबात पिऊ नये . माठातील पाणी प्यावे त्यात कधीतरी वाळ्याची जुडी, मोगऱ्याची चार फुले आलटून-पालटून टाकावी. त्यामुळे तहानेचे उत्तम शमन होते. उन्हातून आल्यावर आधी थोडावेळ बसावे, तोंडात  गुळ, बत्तासा असे थोडेसे गोड टाकून ,मग सावकाश घोट घोट  पाणी प्यावे.

या दिवसात बर्फाचा गोळा,आइस्क्रीम, रस्त्यावरील सरबते पिण्याचा मोह आवरत नाही. पण तो निश्चितपणे पणे टाळावा. त्याऐवजी उन्हाळ्यातले साक्षात अमृत म्हणजे कोकम सरबत, लिंबू सरबत, गुलाब , वाळा, बेल यांची सरबते,जलजीरा, ताक, नारळाचे पाणी अशी नैसर्गिक पेये भरपूर प्यावि. त्यामुळे शरीरातील क्षारांची हानी भरून निघते व थकवाही कमी होतो.

उन्हाळ्यातली तहान कमी होण्यासाठी वेगवेगळी रसाळ फळे याच ऋतूत निसर्ग आपल्यासाठी पाठवतो .द्राक्ष , कलिंगड ,चिबुड ,जाम ताडगोळे, रायवळ आंबे, करवंद ,जांभळं, कोकम अशी कितीतरी फळे.  ही  रसाळ फळे तहानही भागवतात आणि शरीराला आवश्यक ती पोषकद्रव्येही देतात.
फळे रात्री, तसेच जेवणानंतर खाऊ नये. सकाळी नाश्त्याला, दुपारी चार -पाच वाजता ,चांगली भूक असताना खावी .फळे खाताना त्यावर थोडेसे मीठ जिरे, हिंग पावडर घालून खाल्ल्यास उत्तम !रस्त्यावरची कापलेली फळे मात्र अजिबात नको .

उन्हाळ्यातील आहार हा पचायला हलका, गुणाने थंड आणि स्वादिष्ट असावा. यादृष्टीने आहारामध्ये *नाचणी, ज्वारी, तांदूळ ,मूग याचे विविध पदार्थ घ्यावेत.  भाकरी, धिरडे ,उपमा, उकड, डोसा ,मुगाची खिचडी

अशा स्वरूपात थोडे तूप घालून हे पदार्थ जरूर खावेत. पांढरा कांदा हे तर उन्हाळ्यातले औषध !पांढर्‍या  कांद्याच्या माळा उन्हाळा आल्यावर बाजारात दिसू लागतात .रोज एक पांढरा कांदा अवश्य खावा. भाज्यांपैकी कोहळा, दुधी,पडवळ ,दोडका ,शिराळ,घोसाळ ,
कारलं ,लाल भोपळा  ह्या फळभाज्या विशेष करून वापराव्यात. फोडणीसाठी धने जिऱ्याचा वापर जास्त करावा फोडणीसाठी तेलापेक्षा तूप वापरल्यास उत्तम! पातळ ताक जिऱ्याची पावडर ,सैंधव टाकून दुपारी जेवताना अवश्य प्यावे. जेवताना थोडेसे आंबट -गोड गुळांबा, सुधारस,मेथांबा या स्वरूपाचे असल्यास जेवण रुचकर लागते व छान पचतेही.
शिवाय गुढीपाडव्याला कडूलिंबाची पानं ,बत्ताशाच्या गाठी,  हनुमान जयंती- रामनवमीला सुंठवडा, चैत्रगौरीचे आंबेडाळ-पन्ह, भिजवलेल्या हरभर्‍याची उसळ हे सगळं तर आपल्या आहारातं अवश्‍य हवच हवं ! कारण त्यामागेही आपल्या आरोग्याचा विचार आहेच !

उन्हाळ्याच्या काळात ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे अशी लहान मुलं ,वृद्ध तसेच परीक्षेला बसलेले विद्यार्थी यांना जास्त  त्रास होऊ शकतो व त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते.

वृद्धांची विशेष काळजी
ज्येष्ठ व्यक्तींनी
उन्हाळ्यात उन्हात बाहेर फिरणे ,लांबचे प्रवास ,जास्त श्रम टाळावे. पातळ पचायला हलका आहार नाचणीची खीर, मऊ भात तूप ,मुगाची खिचडी असा घ्यावा. पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ घ्यावे. रात्रीचे जेवण लवकर करावे. पायाच्या तळव्यांना झोपताना खोबरेल तेल, एरंडेल तेल चोळावे .

विद्यार्थ्यांसाठी विशेष काळजी 
उन्हाळा आणि परीक्षा यांचे जणू समीकरणच आहे परीक्षांमुळे मुलं रात्री जागरण करुन अभ्यास करतात त्याचा परिणाम म्हणजे पित्ताचा त्रास वाढतो आणि ऐन परीक्षेच्या वेळेस तब्येत बिघडते .त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागरण टाळावे . सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. परीक्षेला जाण्यापूर्वी मऊभात, गूळ तूप पोळी असा साधा पण पोटभरीचा आहार घ्यावा. उन्हातून जाताना लिंबू सरबत, कोकम सरबत बरोबर ठेवावे, त्यामुळे परीक्षेला पित्ताचा त्रास होणे ,चक्कर येणे या गोष्टी टाळता येतात. रात्री पायाच्या तळव्यांना व डोक्याला खोबरेल तेलाचा मसाज करावा,झोप शांत लागते.

लहान मुले
या काळात लहान मुलांना सुट्टी लागल्यामुळे उन्हामध्ये खेळणे ,क्रिकेट ,स्विमिंग, वेगळ्या प्रकारचे छंद वर्ग अशी धमाल असते. अशावेळेस मुलांना शक्यतो दुपारच्या वेळेत इनडोअर खेळ खेळावेत.

रस्त्यावरचे अरबट चरबट खाणं टाळावं .घरी बनवलेली भेळ ,आंबा डाळ,पन्हे,नारळवड्या अशा प्रकारचा खाऊ द्यावा. संध्याकाळी खेळून आल्यावरआंघोळ करावी. पाणी, पातळ पदार्थ भरपूर घ्यावेत मुलांना लघवी साफ व भरपूर होते आहे ना, याकडे लक्ष द्यावे.

थोडक्यात काय! तर योग्य काळजी घेतल्यास फळा- फुलांनी बहरलेल्या या वसंतऋतुचा आपण मनमुराद आनंद घेऊ  शकतो !

- डॉ.हिरा पावरा
समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र कोडीद.
मो नं +91 99750 85483

Post a Comment

0 Comments