Advertisement

वाढते तापमान चिंताजनक -राजेंद्र पाडवी, राज्यमहासचिव बिरसा फ़ायटर्स

  
वाढते औद्योगिकीकरण,औष्णिक वीजनिर्मिती,पेट्रोल डिझेलवर चालणारी वाढती वाहने,वृक्षराजाचा वाढता ऱ्हास,क्लोरोफ्लूरोकार्बन वायूमुळे ओझोन थरांचा होणारा ऱ्हास,हरितगृह वायूंच्या वाढता वापर,बदलती जीवनशैली यामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे.तापमानवाढीने पृथ्वीवरील सजीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला कुठले ना कुठले कमी अधिक प्रमाणात दुष्परिणाम भोगावे लागत आहे.आणि ही फक्त सुरवात आहे!वातावरणातील कार्बन-डायॉक्साईडचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.पृथ्वीवर सर्वत्र वातावरणातील कार्बनचे ४०० पीपीएम हे प्रमाण ओलांडले आहे ही धोक्याची घंटा आहे.तसेच,नैसर्गिक काळ,वेग व परिणाम यांचा समतोल बिघळला आहे.त्यामुळे अनेक दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. वादळं,चक्रीवादळ,महापूर,अतिवृष्टी,ऐनवेळी पाऊस,दुष्काळ यासारख्या प्रलयंकारी घटना मोठ्या प्रमाणात घडतात.जागतिक तापमान वाढीत कार्बन-डायॉक्साईडचे प्रमाण ५७ टक्के इतके आहे.बहुतेक सर्व तज्ञांच्या मते,५०-६० वर्षात विषुववृत्ता पासून ध्रुवापर्यतच्या प्रदेशात सजीवास जगणे अशक्य बनेल. एकदा वातावरणात गेलेला कार्बन एक हजार वर्षे टिकतो आणि तापमान वाढवत राहतो.तापमान वाढ अशीच राहिली तर येणारा भविष्यकाळ चिंताजनक आहे.
       वाढत्या तापमानामुळे ध्रुवावरील व उंच पर्वतावरील बर्फ वितळून समुद्रांची पातळी वाढेल व काठावर वसलेली मुंबईसारखी मोठी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो.तसेच, त्वचेचा कर्करोग,उष्माघात,मेलनामासारखे रोग होऊ शकतात.सध्या,शोधल्या जाणाऱ्या उपायामध्ये प्रचलित'जीवनशैली'व जीवनाचा तथाकथित उच्च दर्जा टिकवायचा हवा असे गृहित धरलेले दिसते; मात्र, या पाश्चात्य पध्दतीने विचार केला,तर विनाश अटळ आहे.कारण,त्यात अस्तित्वापेक्षा अर्थव्यवस्थेची काळजी अधिक आहे.कंपन्यांच्या विकास,भांडवलशाहीच्या विकास, बुलेट ट्रेन,डिजिटल इंडिया,स्मार्ट सिटी,वाढते शहरीकरण यामुळे आपण विकासाकडे नव्हे तर विनाशाकडे जात आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे.'नासाच्या'गोडार्ड अंतराळ संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ.जेम्स हॅनसेन यांचा 'स्टोर्म्स ऑफ माय ग्रँड चिल्डन'ग्रंथात ते म्हणतात की,पृथ्वीवरील जीवन असावे असे वाटत असेल,तर उरलेले खनिज इंधन(कोळसा,तेल,वायू)हे पृथ्वीच्या पोटातच राहू द्यावे.
      तापमान वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या 'शाश्वत विकासांच्या उद्दिष्टांना'युद्धपातळीवर लागू केले पाहिजे.हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे.जगाने २०५० पर्यत हरितगृह वायू उत्सर्जन एकूण शून्यापर्यत आणले पाहिजे.माणसाने आपले जीवन पर्यावरणस्नेही जगणे.घरातील एसी,टिव्ही,फ्रीज,वीज इत्यादी साधनाचा वापर कमीतकमी केला पाहिजे.शक्य तेथे सायकलने प्रवास केला पाहिजे.पुनर्वापर करता येईल अशा उर्जास्रोताचा म्हणजे वारा,सौरऊर्जा व सागर प्रवाहामधून मिळणारी ऊर्जा याचा वापर करता येईल.वनीकरण, वृक्षलागवड,अधिकाधिक राबविणे अत्यंत गरजेचे आहे.पृथ्वीवरील समतोल पर्यावरणासाठी,मानवासह सर्व सजीवसृष्टीच्या संवर्धनासाठी उपाययोजनाबाबत सरकारसह, शासन,सामाजिक संस्था व नागरिकांकडून आता गांभीर्याने विचार होऊन योग्य कृती करणे अत्यावश्यक आहे.
  -✍️राजेंद्र पाडवी, राज्यमहासचिव बिरसा फ़ायटर्स मो.9673661060

Post a Comment

0 Comments