Advertisement

महात्मा राजा रावण दहन प्रथा बंद करण्यासाठी बिरसा फायटर्सचे शासनाला निवेदन; आदिवासी समाजाच्या धार्मिक श्रद्धांचा सन्मान राखण्याची मागणी


आदिवासी समाजाच्या भावनांचा आदर करा; रावण दहन प्रथा बंद करण्यासाठी देशव्यापी धोरण आखा — राज्य उपाध्यक्ष मा.गणेश खर्डे

शहादा प्रतिनिधी | नंदुरबार
महात्मा राजा रावण दहन प्रथा बंद करण्यासाठी तसेच राजा रावण यांना श्रद्धास्थान मानणाऱ्या आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना, सांस्कृतिक अस्मिता आणि परंपरांचा सन्मान राखण्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने शासन व प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रथेचा देशव्यापी पुनर्विचार करून ती बंद करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. गणेश खर्डे यांनी केली आहे.

आदिवासी समाजातील अनेक समुदाय महात्मा राजा रावण व मेघनाद यांना श्रद्धास्थान मानतात. त्यांच्या धार्मिक परंपरा, सांस्कृतिक स्मृती आणि श्रद्धांचा आदर राखणे आवश्यक आहे. दसऱ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमांमुळे राजा रावण यांना पूजनीय मानणाऱ्या आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याची भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.

भारत हा विविध धर्म, संस्कृती, भाषा आणि परंपरांचा देश आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या श्रद्धांचा सन्मान राखून सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुता टिकवणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. या विषयावर आदिवासी संघटना, सामाजिक प्रतिनिधी, इतिहास संशोधक आणि संबंधित समुदायांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात भारतीय संविधानातील धार्मिक स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच रावण दहनाच्या कार्यक्रमांदरम्यान कोणत्याही व्यक्तीकडून जातीय अपमान, धमकी, हिंसाचार किंवा कायद्याने दंडनीय असे कृत्य घडल्यास उपलब्ध पुरावे व लागू कायद्यांच्या आधारे निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली, मुख्यमंत्री, संबंधित राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी नंदुरबार आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे मागण्या मांडण्यात आल्या आहेत. तसेच निवेदनावर झालेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात देण्याची विनंती करण्यात आली आहे.

“आमची भूमिका कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा द्वेष करण्याची नसून आदिवासी समाजाच्या श्रद्धा, सांस्कृतिक अस्मिता आणि भावनांचा सन्मान राखण्याची आहे. महात्मा राजा रावण दहन प्रथेचा देशव्यापी पुनर्विचार करून ती बंद करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा,” अशी भूमिका बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष मा. गणेश खर्डे यांनी व्यक्त केली.

शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आदिवासी समाजाच्या मागण्यांवर योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने व शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

— मा. गणेश खर्डे
राज्य उपाध्यक्ष, बिरसा फायटर्स, महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments