Advertisement

दिवाळीपूर्वी पीक नुकसानभरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!


अजंग येथील शेतकरी गोपाल माळी यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भावनिक निवेदन

अजंग प्रतिनिधी :
यंदा पावसाने साथ न दिल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक नुकसानीची शासनाकडून मिळणारी मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी अजंग येथील शेतकरी गोपाल माळी यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
गोपाल माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी त्यांनी मका आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र पुरेसा पाऊस व पाण्याची उपलब्धता न झाल्याने मक्याची अपेक्षित वाढ झाली नाही. कपाशीच्या पिकाचीही अत्यंत खराब अवस्था झाली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

“शेतीवरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. उत्पादन घटल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दिवाळी सण जवळ आला असून घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्ज तसेच इतर आवश्यक गरजा भागवणे कठीण झाले आहे,” अशी व्यथा गोपाल माळी यांनी निवेदनातून मांडली.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत तातडीने वितरित करून दिवाळीपूर्वीच नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“सरकारकडून दिवाळीपूर्वी मदत मिळाली तरच आमच्या शेतकरी कुटुंबाची दिवाळी आनंदाने साजरी होईल; अन्यथा यंदाची दिवाळी आमच्यासाठी अडचणीची ठरणार आहे,” अशी भावनिक मागणी गोपाल माळी यांनी केली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात आणि पीक नुकसानभरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी गोपाल माळी यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments