Advertisement

पत्रकार जगदीश ठाकूर यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व धमकी देणाऱ्या अभियंता सचिन पाटील व साथीदारांना तात्काळ अटक करा -बिरसा फायटर्सची मागणी

भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध करणे ही ख-या व निर्भिड पत्रकारांची ओळख - सुशिलकुमार पावरा

नंदुरबार प्रतिनिधी: नंदुरबारमध्ये पत्रकार जगदीश ठाकूर यांना त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयितांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                   निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या 'घरकुल' योजनेच्या अनुदानातील भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून हा प्रकार घडला. नंदुरबार पंचायत समितीचे गृहनिर्माण अभियंता सचिन पाटील हे आपल्या ५ ते ८ साथीदारांसह पत्रकार जगदीश ठाकूर यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी तिथे शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केला आणि पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र निषेध करत आहोत, संबंधित अभियंत्यावर पत्रकार हल्ला संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
            पत्रकार हे लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे.पत्रकार हे समाजात घडणाऱ्या घटनांची सत्य माहिती गोळा करून दबावाशिवाय  निर्भीडपणे जनतेपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहचवण्याचे काम करतात. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे.जिल्ह्यात अनेक सरकारी योजनेतून करोडो रुपये निधी येतों.जिल्ह्यात सगळ्याच विभागांत काही सरकारी अधिकारी व ठेकेदार मिळून सरकारी अनुदानात गैरव्यवहार करून मोठा भ्रष्टाचार करतात. भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध करणे ही  ख-या व निर्भिड  पत्रकारांची ओळख आहे.अशा पत्रकारांसोबत आम्ही कायम आहोत. पत्रकारांवर हल्ला व धमकी आम्ही कदापि सहन करणार नाही.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments