जिल्हा पोलिस प्रशासन व न्याय व्यवस्थेवर अविश्वास; नातेवाईकांची तक्रार देण्यास नकार
धडगांव प्रतिनिधी : बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुशिलकुमार पावरा यांच्या वडीलांचे जहांगीर फेंदा पावरा यांचा दूर्देवी मृत्यू झाला आहे.धडगांव तालुक्यातील गौ-या या गावातील एका केटी विहीर म्हणजेच एका छोट्याशा तलावात रविवारी दिनांक १ मार्च २०२६ रोजी पहाटे संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. जहांगीर पावरा यांच्या डोळ्यांच्या उजव्या बाजूला व कपाळावर तसेच डोक्यावर ३-४ ठिकाणी जखमा झाल्या होत्या व रक्त सांडत होते.हे सगळे बघून माझ्या भावाला मारून फेकून दिले म्हणत बहिणींनी हंबरडा फोडला व नातेवाईकांनी जोराजोरात रडायला सुरुवात केली. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याशी सुशिलकुमार पावरा सह ९ सामाजिक कार्यकर्त्यांचा वाद सुरू असतांना वडिलांचा अशा प्रकारे घात झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस प्रशासन व न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवत नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला.जिवंतपणी माझ्या नव-याचा घात केला व मरणानंतरही मृतदेहाची चिरफाड करून हेडसांड करणार,असे म्हणत एकंदरीत जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेवर अविश्वास दाखवत मृतदेहाचे पोस्टमाटम करण्यासही आईने नकार दिला.आदिवासी पावरा समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे चूलवड येथे जहांगीर पावरा यांचे त्याच दिवशी रात्री अंतिम संस्कार करण्यात आले.
जहांगीर पावरा हे जिल्हा परिषद शाळेत माजी शिक्षक होते.शांत स्वभाव व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. मास्तर या नावाने लोक त्यांना नेहमीच हाक मारत असत.जहांगीर पावरा हे शिक्षक होते त्यामुळे त्यांचे कोणाशीच वैर नव्हते.त्यामुळे त्यांचा असा घात व्हायला नको होता.असे म्हणत परिसरातील लोकांनी शोक व्यक्त केला.
एकीकडे मुलाला तडीपार करण्याचे पोलिस प्रशासन व राजकिय षडयंत्र आणि दुसरीकडे वडीलांचा संशयास्पद मृत्यू हे दोन्ही कृत्य कुठेतरी घडलेल्या घटनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करतात.सुशिलकुमार पावरा सर,या कठीण प्रसंगी संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,या कठीण प्रसंगी परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देओ. मृत आत्म्याला चिरशांती प्रदान करो.हिच भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.


0 Comments